न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी सावली ‘गायब’ होणार असल्याने झिरो शॅडोचे निरीक्षण करण्याची संधी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरीच्या डी. आय. टी. अॅस्ट्रॉनॉमी क्लब तफ्रे संस्थेच्या प्रांगणात उपलब्ध करूण देण्यात येणार आहे.
या संधीचा फायदा पिंपरी चिंचवड भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. एन. माळी व डी. आय. टी. अॅस्ट्रॉनॉमी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम निशुल्क असून दुपारी १२ ते १ या वेळात सर्वांसाठी खुला आहे.
पिंपरीचे अक्षांश १८. ६ ओं असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करत १४ में २०१९ रोजी ख – मध्य बिंदू पार करेल व या दिवशी पिंपरीमधे स्थानिक वेळेनुसार बारा वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार १२ वाजून ३१ मिनिटांनी आपली सावली दिसेनाशी होईल. सूर्य २१ जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करुन दक्षिणेला परत फिरला की जुलैमधे अशी घटना परत घडते, परंतु, यावेळेस भारतात पावसाळा असल्याने आपल्याला त्यावेळेस याचे निरीक्षण करता येत नाही. त्यामुळे येत्या १४ मे रोजी या घटनेचे निरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे.











