- कारवाईचेही एजन्सीला अधिकार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२४) :- पिपरी-चिंचवड शहराताल हवेची गुणवत्ता नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचबरोबर नागरीकांचे उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने विशेष कार्यवाही हाती घेतली आहे. घनकचरा, राडारोडा, प्लॅस्टिक, जैववैद्यकीय अशा स्वरुपातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र एजन्सी नेमली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात वाढणारे प्रदूषण व त्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना व मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केले आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने १८/०९/२०२४ जीआरच्या आदेशान्वये ग्राफ तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात ठेवणे व नागरीकांच्या उत्तम आरोग्य पुरविण्याकरीता महापालिकेने कार्यवाही हाती घेतली आहे. त्यानुसार शहरात घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६, बांधकाम राडारोडा व्यवस्थापन अधिनियम २०१६, प्लॅस्टिक अधिनियम २०१६, जैववैद्यकीय घनकचरा अधिनियम, पर्यावरण संवर्धन अधिनियम १९८६ इत्यादीनुसार शहरातील सावर्जनिक ठिकाणांवर देखरेख करण्यात येणार आहे. त्याकरीता मनपामार्फत स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नदीपात्रावरही लक्ष…
महापालिका हद्दीत स्थानिक नागरिकांकडून तसेच अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेने नदी नाले यांच्या काठावर अनाधिकृतपणे भराव घनकचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, रस्ते-पदपथावर घाण करणे, चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम नियंत्रण नियमावलींचे उल्लंघन केले जाते. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, सार्वजनिक सभा समारंभ संपल्यावर साफसफाई न करणे, मनपा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे असे प्रकार केले जातात.
व्यावसायिक आस्थापनेमार्फत कचरापेटी ठेवली जात नाही. जैव वैद्यकीय घनकचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकला जातो. कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणे, मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छता ठेवणे असे प्रकार आढळून येतात. याशिवाय, डास उत्पत्ती स्थानाची निर्मिती करणे तसेच लहान उद्योजक कारखानदार मार्फत सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे नदीमध्ये सोडणे अशा कृत्यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. अशा प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.














