न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- निगडीतील भक्ती शक्ती चौकामधील मोठा हायटेन्शन टॉवर लवकरात लवकर हलवण्यात यावा, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नगरसेवक व मनसे गटनेते सचिन चिखले यांनी वर्तविली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यांनी निवेदन दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ”निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाण पुलाचे काम जोरात चालु असून, हे काम चालु असताना मोठ्या प्रमाणात खोदाईचे काम चालु आहे. चौकामध्ये मधोमध शहरातील मोठा हायटेन्शन टॉवर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाईचे काम पुर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालु आहे.
हा टॉवर इतका घातक आहे की, अचानक जर मोठे वारे व पाऊस आल्यास हा टॉवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. तरी आपणास नम्र विनंती की लवकर हा टॉवर हलविण्यात यावा. जर जीवितहानी झाली तर पालिका प्रशासन जबाबदार राहील, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.











