न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. या दुष्काळात मनुष्यासह मुक्या जनावरांचे देखील हाल होत आहेत. परंतु, याचे सोयरेसुतक पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनास नाही, असे दिसते. एका बाजूला पाणी बचतीचे धडे नागरिकांना द्यायचे तर, दुसऱ्या बाजूला होणारी पाण्याची नासाडी थांबविण्यास यंत्रणा राबवायची नाही, असे धोरण महापालिकेने राबविले आहे की काय, याबाबत संशय निर्माण होत आहे. आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी याबाबत महापालिका आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, शहरात पाणीसाठा कमी शिल्लक आहे म्हणून दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांचे हाल चालु आहेत. काहींना तर पाण्यासाठी कामावरसुद्धा जाता येत नाही त्यामुळे नागरिकांचा रोजगार देखील बुडतोय. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्यावाचून जनावर मरत आहेत.
पाण्यासाठी वणवण चालू आहे. हे असताना पिंपरी चिंचवड शहरात कचराकुंड्या पाण्याने धुवण्यात पालिका धन्यता मानत आहे. मोरवाडी येथे बीव्हीजी या ठेकेदारामार्फत कचरा धुण्यासाठी पाणी वापरतानाचा टँकर व कर्मचारी यांचा व्हिडीओ आपणास पाठवत आहे. यावर आयुक्तसाहेब आपण काय कार्यवाही करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे, असे या पत्रात भुंबे यांनी म्हटले आहे.


















