न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- भांडण करत असलेल्यांना हटकल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.
प्रमोद प्रकाश साखरे (२६, भोंडवे बाग, रावेत), वैभव भाऊसाहेब तुपे (२८, रा.ओटास्कीम, निगडी), अजय बाबासाहेब पोळ (२१, गुरुदत्त कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण कांबळे (नेमणूक गुन्हे शाखा) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी प्रवीण कांबळे सहकाऱ्यांसोबत निगडी परिसरात गस्त घालत असताना, संशयित आपसात भांडण करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, संशयितांनी आपसात संगनमत करून पोलिसांवर हल्ला चढविला. त्यांनी हवालदार कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच ‘पोलिसांना खूप माज आला आहे,’ असे म्हणत एका पोलिसाचे बोट पिरगळले. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ आणि शत्रुघ्न माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले असता, त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. संशयित प्रमोद साखरे आणि वैभव तुपे यांनी भिंतीवर डोके आपटून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.












