न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- भाजपा नगरसेविका सीमा सावळे यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितलं आहे की “पिंपरी विधानसभेसाठी युती होणार की नाही, हे मला माहिती नाही. पण मी पूर्णतः तयारी चालू केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळणार का नाही हे पण मला माहिती नाही, जरी नाही मिळालं तरी मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे”
यावर पिंपरी विधानसभेसाठी शिवसेनेचे प्रबळ दावेदार असलेल्या युवराज दाखले यांनी प्रतिक्रिया देताना सीमा सावळे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. “सीमा सावळे या अमरावती लोकसभेसाठी इच्छुक होत्या. तेवढ्यात भाजप व शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून युती झाली. त्यामुळं सावळेंच निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढं त्यांचं काहीही चाललं नाही. म्हणून त्यांना युतीवर व स्वपक्षावर वैयक्तिक प्रचंड राग आहे.
युती व्हावी म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. पण अशा काही वक्तव्यामुळे लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरी युतीच्या मावळ व पुणे लोकसभा समन्वयकांनी अशा लोकांवर कार्यवाही करावी. जर एखादा पदाधिकारी उघडपणे अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा करत असेल तर, पक्षाने तात्काळ कार्यवाही करून, त्यांना निर्णय घेण्यास मुक्त करावे. तसेच मावळ लोकसभेत खूप प्रयत्नातून युतीला पोषक वातावरण तयार करण्यास यश मिळाले आहे. आता जो कुणी युतीच्या आड येईल त्यांची तक्रार थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना देण्यात येईल, असा ही इशारा त्यांनी दिला आहे.
सीमा सावळे यांचे “आमचं ठरलंय” अशा आशयाचे डिझाईन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर युवराज दाखलेंच्या समर्थकांकडून “आमचं तुमच्या अगोदर ठरलंय” असं डिझाईनच्याच माध्यमातून उत्तर मिळत आहे. सोशल मीडियातील या शीतयुद्धाचीही पिंपरी विधानसभेत चर्चा होत आहे. दाखलेंच्या उमेदवारीला युतीच्या नेत्यांकडून पण ग्रीन सिग्नल आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजतं.











