- भोगावी लागू शकते जेलवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- मकरसंक्रांतीनिमित्त पतंगांनी शहरातील दुकाने सजली आहेत. यात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होत आहे. या मांजावर बंदी आहे. तरीही काही विक्रेते त्याची विक्री करत आहेत. अशा मांजाची विक्री करू नये तसेच ग्राहकांनीदेखील त्याची खरेदी करू नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि नागरिक जखमी झाल्याच्या घटना सातत्याने घडतात. नायलॉन मांजामुळे काहींना जीवदेखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा मांजाची निर्मिती, वाहतूक, साठा आणि विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरीही पतंग विक्रीच्या आड छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचीही विक्री होत असून त्यावर पोलिस नजर ठेवून आहेत.
प्लास्टिक किंवा नायलॉन लॉन मांजामुळे पक्षी आणि प्राण्यांनाही धोका असतो. या मांजामध्ये अडकून पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. तसेच ते जखमीही होतात. कचऱ्यात किवा कुठेही पडून असलेल्या या मांजामुळे प्राण्यांनाही इजा होऊ शकते. म्हणून नायलॉन मांजावर बंदी आहे. हा मांजा शरीराच्या कोणत्याही भागाला लागल्यास गंभीर दुखापत होते. या मांजामुळे दुचाकीस्वारांसह काहींना जीवदेखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
नायलॉन तसेच बंदी असलेल्या मांजाची खरेदी ग्राहकांनी करू नये. असे आढळून आल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तशा सूचना स्थानिक पोलिसांना तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना दिल्या आहेत.
– संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त…–











