- अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईला मनुष्यबळाअभावी येईना गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १३ जानेवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत घरे, बेकायदेशीर होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, जाहिरात फलक मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. पीएमआरडीएची परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील त्याकडे सोयीस्करपणे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
महानगराच्या हद्दीत संबंधितांकडून नियम धाब्यावर बसवून अनधिकृतचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. मात्र, दुसरीकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाची मनुष्यबळाअभावी फरफट होताना दिसत आहे. तसेच विकास परवानगी विभागाकडून देखील याबाबतच्या सुनावण्यांना विलंब होत असल्यामुळे कारवाईला अपेक्षित गती येत नाही, अशीही स्थिती आहे.
कोणाचीही परवानगी न घेता ग्रामीण हद्दीत अनधिकृतपणे राजरोसपणे घरांची उभारणी होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, ड्रेनेजलाईन, नद्यांच प्रदुषण असे नानाविध प्रश्न निर्माण होत आहेत. अशा अनधिकृत घरांना वेळीच आवरणे क्रमप्राप्त ठरत असताना कारवाईला गती येणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्जची उभारणी करण्यात आली आहे. यांपैकी बऱ्याच होर्डिंगला संरचनात्मक स्थिरता नसल्यामुळे अनेकदा अपघात सुद्धा घडले आहेत. तसेच काही होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. यामध्ये काही नागरिकांचा जीव सुद्धा गेला आहे. अशा होर्डिंग्जवर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
अनधिकृत घरं, बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्जवर निष्कासनाची कारवाई सुरुच आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि प्रलंबित सुनावण्यांमुळे कारवाई थोडीशी संथ होती. कारवाई नियमितपणे सुरूच राहणार आहे.
– डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, सहायक आयुक्त (प्र.) – अतिक्रमण निर्मूलन विभाग (पीएमआरडीए)…
















