- देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्यात संस्थेचे महत्वपूर्ण योगदान..
- केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाकडून संस्थापक भराटे बंधूंचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२५) :- केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या वतीने शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील मे. रामाई डेअरी फार्म या संस्थेचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी रामाई डेअरीचे संस्थापक आकाश रावसाहेब भराटे आणि सुरज रावसाहेब भराटे (वडाचिवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) या दोन्ही बंधूंना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ (आरजीएम) या अंतर्गत देशी गायी-म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते. उद्योजकतेला सक्षम करणे आणि पशुधन अर्थव्यवस्थेत बदल करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोमवारी (दि. १३) रोजी पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ‘उद्योजकता विकास परिषद २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारत सरकारचे केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार देवरे, उद्योजक, लाभार्थी, शेतकरी, शासकीय अधिकारी आणि उद्योग संघटना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील मे. रामाई डेअरी फार्म या संस्थेचे प्रवर्तक आकाश भराटे आणि सुरज भराटे या दोघा बंधूनी मोठ्या हिमतीने मोठ्या स्वरूपात या व्यवसायासाठी भाग भांडवल उभे केले. केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या ‘आयव्हीएफ तंत्रज्ञानासह ब्रीड मल्टीफिकेशन फार्म’ या योजनेची माहिती घेतली. जानेवारी २०२३ साली ‘मे रामाई डेअरी फार्म’ या संस्थेची त्यांच्या गावी त्यांनी स्थापना केली. या माध्यमामधून दुग्ध उत्पादनासह देशी गायींच्या नव्या प्रजाती वाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन वर्षात ‘आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गायींच्या तब्बल ४६ कालवाडी जन्मास घालून त्यांचे ते उत्तमरीत्या संगोपन करीत आहेत.
देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर २०१४ मध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ (आरजीएम) सुरु करण्यात आले. या अंतर्गत देशी गायी-म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जात आहे. या माध्यमातून भविष्यात सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था म्हणून नावारूपास येण्याचा आमचा मानस असल्याचे भराटे बंधूनी सांगितले.











