- उपजिल्हाधिकाऱ्यांची लाभार्थ्यांना तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २३ जानेवारी २०२५) :- देहू बाह्यवळण (रिंगरोड) व देहु ते तळवडे दरम्यानचा रस्ता ३० मीटर रुंदीकरणासाठी शासनाने बाधित क्षेत्राचे भूसंपादन केलेले आहे. त्या क्षेत्राची बाधितांनी रक्कम घेतली आहे. त्यांनी भूसंपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण व बांधकामे १ फेब्रुवारी पूर्वी स्वतः काढून घ्यावेत. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करीत पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अतिक्रमणे व बांधकामे पाडण्यात येतील. यासाठी होणारा खर्च संबंधिताकडून वसुल करण्यात येईल, अशी तंबी उपजिल्हाधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे.
देहू आळंदी रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने देहू ते तळवडे शिव दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रकल्प बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक विठ्ठलवाडी येथे आयोजित केली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी माने बोलत होते. उपअभियंता जानवी रोडे, भूसंपादन अधिकारी गणेश ठोकळ, देहु नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता संघपाल गायकवाड, नगररचना अधिकारी सुरेंद्र आंधळे व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
देहू आळंदी रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरणामध्ये आळंदीकडे जाताना डावीकडील (उत्तरेस) २०१३ मध्ये अतिक्रमणे काढली होती. मात्र, तिथे पुन्हा अतिक्रमण होऊन पक्की बांधकामेही झाली आहेत. तसेच दक्षिण बाजूकडील अनेक बाधितांनी बाधित क्षेत्राचे पैसे घेतले आहेत. अनेकांनी खरेदीखतही लिहन दिले आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या बाधितांनी पैसे घेतले आहेत. त्यांनी १ फेब्रुवारीपूर्वी बाधित क्षेत्र रिकामे करावे, अन्यथा पोलीस प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
भूसंपादनासाठी शासनाला सहकार्य करा..
ज्या शेतकऱ्यांना अथवा बाधितांना माहिती नाही, त्यांच्यासाठी देहू नगरपंचायत येथे रस्ता रुंदीकरणाचा नकाशा, बाधित जागेची माहिती, त्यांच्या क्षेत्राशी असणारे रक्कम व ज्यांनी रक्कम घेतलेली आहे, त्यांच्या नावाची यादी लावण्यात येणार आहे. उर्वरित बाधितांनी माहिती मिळाल्यानंतर लवकरात लवकर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे उर्वरित बाधितांना आवाहन करण्यात आले आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची यावेळी सांगण्यात आले.













