- स्वस्तात शॉप आणि जमीन डेव्हलपचे आमिष पडले लाखोंना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- तिघांनी संगनमताने बँकेकडून दोन शॉप स्वस्तात खरेदी करून देण्याचे व्यावसायिकाला आमिष दाखवले. त्यासाठी बनावट सेल्स सर्टिफिकेट तयार केले. आरोपीने मुलाच्या लग्नासाठी फिर्यादीकडून सोन्याचे दागिने बनवून घेतले. त्याचे पैसे व्यवहारातून वळते करून घेण्याचे फिर्यादीला आश्वासन दिले. तसेच महिलेची बारा गुंठे जमीन डेव्हलप केल्यास त्यातून साडेबावीस टक्के बांधकाम फिर्यादीला मिळेल, असे खोटं सांगीतले. त्यासाठी फिर्यादीकडून घेतलेले पैसे महिलेच्या खात्यावर भरल्याच्या खोट्या पावत्या आणि एमओयु देत वकिलांच्या नावाची फिर्यादीस खोटी नोटीस पाठवली.
बँकेच्या कर्ज खात्यात पैसे भरल्याच्या खोट्या पावत्या पाठवून फिर्यादीची 78 लाख 18 हजार 800 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीने आरोपीला पैसे मागितले असता आरोपीने बँकेकडून कर्ज काढण्यासाठी दिलेल्या चेकचा गैरवापर करत, त्यावर दीड कोटींची रक्कम टाकून तो चेक बँकेत भरला. चेक बाउन्स झाल्यामुळे आरोपीने फिर्यादीला तुम्हीच माझे दीड कोटी रुपये देणे लागत असल्याचे सांगत, पुन्हा माझ्याकडे पैशांची मागणी केल्यास चेक बाउन्सची तक्रार पोलिसात देण्याची धमकी दिली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार एप्रिल 2017 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान कस्पटे वस्ती वाकड येथे घडलेला आहे. याप्रकरणी देवकर यांनी आरोपी विलास, तेजस आणि महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील घटनेचा तपास सपोनी पवार हे करीत आहेत.















