- डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांच मत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदुरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२५) :- श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर निर्माण होत असलेले मंदिर हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची अस्मिता आहे. जगात अनेक मंदिरे असतील परंतु तुकोबारायांची साधनाभूमी, अनुष्ठान भूमी असणाऱ्या भंडारा डोंगरावर साकार होत असलेल्या या भव्य- दिव्य मंदिराचे प्रांगण, अंगण निर्मळ, पवित्र असे आहे. महाराष्ट्रातील तमाम भाविक वारकरी बंधू-भगिनींनी उदार अंतःकरणाने भरीव आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे केले.
माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने भंडारा डोंगर ट्रस्ट व दशमी सोहळा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने ‘सत्यगुरुराये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ।। बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरी ।। माघ शुध्द दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ।।’ या संत तुकाराम महाराजांच्या गुरुकृपेच्या अभंगावर डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी चिंतन करीत आपली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी रुजू केली.
पानेगावकर महाराजांनी पुढे सांगितले की विश्वातील अध्यात्मिक क्षेत्रात ज्या कृपेने मनुष्य जीवनाची उंची वाढते, मनुष्य जीवन शाश्वत, चिरंजीव, मौल्यवान आणि भगवंत स्वरूप होते अशा साधनेला कृपा म्हणतात. आणि ती कृपा या पवित्र अशा भंडारा डोंगराच्या भूमीमध्ये तुकोबारायांनी साधली. तुकोबारायांनी त्या साधनेची शक्ती येण्यासाठी रात्रंदिवस सद्गुरुंचा ध्यास घेतला. जीवनाच्या वाटचालीत प्रत्येक काळामध्ये गुरूंची सातत्याने गरज असते. गुरूंकडून अक्षर ज्ञान मिळत असते. शाळेमध्ये जे शिकले त्यालाही अक्षर म्हणतात आणि सद्गुरूंकडून शिकल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होते ते अक्षय, अविनाशी असे ज्ञान असते. शाळेतले अक्षर कळाले तर आपले जीवन चांगले होते परंतु अध्यात्मातले अक्षर ज्ञान जर झाले तर ते मात्र अविनाशी असेच असते आणि त्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे साक्षात् जगद्गुरु तुकाराम महाराज. आकाशा एवढे कार्य असणारे, वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबाराय.
अनेक साध्या, सोप्या शब्दात अनेक दृष्टांत सांगत पानेगावकर महाराजांनी नफा, तोटा, लाभ, लोभ, कमाई, वरकमाई या शब्दांचा व्यवहारी जीवनातील अर्थ सांगितला. माय-बापांचे आशीर्वाद लाभले तर संसार सुखाचा, समाधानाचा होतो. आणि सद्गुरूंची जर कृपा झाली तर परमार्थ साधतो. कृपा फक्त सद्गुरूच देऊ शकतात. ‘आता तुम्ही कृपावंत | साधुसंत जिवलग ||’ ज्याने कोणतेही व्यवहार केले पण असत्याला हात लावला नाही, ज्याने लाभाचा विचार केला नाही आणि सत्य कधीही सोडले नाही अशांनाच सद्गुरुंचा कृपा लाभ होतो. जगद्गुरू तुकोबारायांची दृष्टी, त्यांची वाणी, त्यांचे विचार, त्यांचे ह्रदय, त्यांचे हेतू आणि त्यांचे जीवन हे फक्त सत्याला धरून असल्यामुळेच महाराजांना सद्गुरूंची कृपा झाली. ज्यांचे जीवन सत्य स्वरूपात गेले आहे आणि ज्यांच्या अंत:करणाचा भाव शुद्ध झाला आहे अशा शिष्याच्या शोधात गुरु स्वत: शिष्याला शोधून काढतो. सध्या गुरु जास्त झाले असून गुरूंचा महापूर आला आहे. आज प्रत्येकाला गुरु व्हावे वाटते परंतु आजकाल तसे शिष्य मात्र सापडत नाहीत. विवेक, वैराग्य, सत्याची आस आणि मोक्षाची इच्छा ही शिष्याची प्रमुख अशी लक्षणे असून आजच्या शिष्यांमध्ये या गुणांचा अभाव आहे. संपूर्ण जगच माझ्या विठ्ठलाने भरून गेले आहे अशी ब्रह्मनिष्ठा व अहंकार विरहित निर्दोष जीवनचर्या हे गुरूंचे प्रमुख लक्षण आहे. गुरु हा संत कुळीचा, गुरु हा प्राण विसावा, गुरु विना देव दुजा, गुरु साक्षात् परब्रम्ह, देवा पेक्षा ही गुरु श्रेष्ठ असतो या भावनेने महाराजांनी गुरूची सेवा केली. कारण सेवे शिवाय गुरुकृपा होत नाही. गुरुकृपा झाल्यानंतर जसा देव आणि भक्तात भेद राहत नाही तसेच गुरु व शिष्यात भेद राहत नाही. विश्वाचे रहस्य उलगडण्यासाठी, भागवत धर्माची पताका अधिकाधिक उंच करण्यासाठी, सर्व अठरापगड जाती पातीतील समाज एकत्र करण्यासाठी, अद्वैताचे, सुख समृद्धीचे मळे फुलविण्यासाठी तुकोबारायांच्या स्वप्नात येत गुरु बाबाजी चैतन्यानी तुकोबारायांना ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र दिला असे महाराजांनी सांगितले.
या कीर्तन प्रसंगी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज हभप प्रशांत महाराज मोरे, योगीराज पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर, प्रशांत ढोरे, रवींद्र भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपाध्यक्ष विजय सदाशिव बोत्रे, गजानन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.