- प्रभागातील प्रलंबित समस्यांकडे आयुक्तांचे वेधले लक्ष..
- अर्थसंकल्पात चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला झुकतं माप देण्याची एकमुखी मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याक़डून गुरुवारी (दि. १३) घेतला. पिंपरीतील प्रलंबित प्रश्न तथा विकासकामांचा आढावा नियमितपणे घेतला जाणार आहे. बैठकीत प्रभागातील शक्य तितक्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे.
महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात चिंचवडच्या तुलनेत पिंपरी मतदारसंघाला अधिक निधी देण्याची मागणी, आमदार अमित गोरखे यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका निवडणूक झाली नसल्याने गेली ३५ महिने महापालिकेत प्रशासक राज आहे. त्यामुळे नागरी प्रश्न तातडीने सुटत नाहीत. विकासकामेही प्रलंबित आहेत, याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. प्रभागनिहाय प्रलंबित समस्या मांडल्या. यावेळी माजी नगरसेवक शैलेश मोरे, शीतल शिंदे, राजेश पिल्ले, संदीप वाघेरे, चेतन घुले, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पलांडे, शर्मिला बाबर, कुणाल लांडगे, कैलास कुटे, गणेश लंगोटे, आर एस कुमार, राजेंद्र बाबर, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.
आर एस कुमार यांनी निगडी-प्राधिकरणात भेडसावणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाकडे लक्ष वेधले. प्राधिकरणातील वाहतूक कोंडीचाही मुद्दा मांडला.
उद्यानांची देखभाल होत नसल्याचे सांगत महापालिकेची क्षेत्रीय़ कार्यालयाची इमारत अपुरी पडते आहे, असे बाबर म्हणाल्या.
वाघेरे यांनी बजेटमध्ये आपल्या प्रभागासह पिंपरी गावासाठी निधी देण्याची मागणी केली. पिंपरी कॅम्प या शहराच्या बाजारपेठेतील व्य़ापाऱ्यांना वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले. झोप़डपट्टी पुनर्वसनाचे (एसआरए) काम नीट होत नसल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
अनुराधा गोरखे गोरखे यांनी शाहूनगर येथे पडून असलेल्या अडीच एकरच्या भुखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी केली. त्यांनी सुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला.
संत तुकारामनगर येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग द्या, असे पालांडे म्हणाल्या. वल्लभनगर एसटी आगाराशेजारचा मोकळा भुखंड विकसित करा, अशी सूचना त्यांनी केली.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल पिल्ले यांनी खंत व्यक्त केली. ती सक्षम करण्यासाठी पीएमपएमलच्या ताफ्यात बसची संख्या वाढली पाहिजे, असे ते म्हणाले.
बोपखेलवासियांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या नव्या पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने तिकडे जाणाऱ्या नव्या व्यक्तींचा गोंधळ होत आहे. त्यामुळे हे फलक तातडीने लावावेत, अशी मागणी घुले यांनी केली.
बीआरटीमुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी तसेच पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याकडे शैलेश मोरे यांनी लक्ष वेधले.












