- अनुशेष भरून काढण्याची आयुक्तांकडे केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२५) :- शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्र ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा अनुशेष बाकी आहे, तो भरून काढण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष तरतूद करावी अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे. दरम्यान नुकतीच या विषयासाठी आ. अमित गोरखे यांनी आयुक्तांची माजी नगरसेवकांसह भेट घेतली होती.
शनिवारी (दि.१५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात आयुक्त सिंह यांच्या समवेत आ. उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी विधानसभा क्षेत्रातील भाजपाच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेविका शैलजा मोरे, जयश्री गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभाग क्रमांक १९ मधील नाले विकसित करणे, प्रभाग क्रमांक १० मधील प्रलंबित कामे मार्गी लावणे, मेट्रोलगत पार्किंग साठी केलेले आरक्षण विकसित करणे, खराळवाडी येथील मैदानाचे व व्यायाम शाळेचे आरक्षण विकसित करणे, वाल्मिकी चौक ते यशोपुरम चौक मार्गावर अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकास करणे, पिंपरी विधानसभा परिसरातील पाणी प्रश्न सोडविणे, आवश्यक तेथे नालाबंडिंग करणे, अहिंसा चौक सुशोभीकरण करणे, ऑक्सिजन पार्क मध्ये विरंगुळा केंद्र उभारणे तसेच पिंपरी विधान परिसरात असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा एसआरए अंतर्गत विकास करणे व सुरू असणारे प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली व तसे पत्र आयुक्त सिंह यांना देण्यात आले.











