न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- संत ज्ञानेश्वर उद्यानातील ४० फुटी खैराच्या उंच झाडावर मांज्यामध्ये अडकलेली कोकिळा जीवाचा आक्रांत करीत सुटका होण्यासाठी धडपड करीत असतानाच शालेय विद्यार्थी आयुष आणि मनीष पाठक यांच्या निदर्शनास आले.
याची माहिती त्यांनी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांना दिली. यावेळी पक्षीप्रेमी सुरेश जाधव, रामचंद्र ससाणे सर, गल्लू भोळे, महेंद्र पाठक, विजय हिरे, दत्तात्रय साडेकर, संपत शिर्के यांनी २० फुटी दोन बांबू तसेच कोयत्याच्या साह्याने खैराच्या झाडावर ज्या फांदीला मांज्यामध्ये कोकिळा अडकली होती ती फांदी तोडली व कोकिळेची सुटका केली. ही घटना आज शुक्रवार (दि. १७ मे) रोजी सकाळी ७.०० वाजता घडली.

परंतु, झाडाची उंची आणि फांद्यांमुळे सदर कोकिळेपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होत होती. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर बांबू आणि कोयत्याच्या बनविलेल्या आकड्याच्या मदतीने कोकिळेची सुखरूप सुटका करण्यात यश आले. उजव्या पंखास मांज्यामुळे जखम झाली होती. प्राथमिक उपचारानंतर काहीच तासांमध्ये कोकिळेनी आकाशात पुन्हा भरारी घेतली.
या घटनेनंतर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले, “चिनी मांज्यावर प्रशासनाने कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. आजपर्यंत एक घार, गाय बगळा, गव्हाणी घुबड, कावळा, यांची मांज्यातुन सुटका करण्यात आली आहे. मांज्यामध्ये पक्षी अडकण्याच्या घटनांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे. मांज्यामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. घटत्या पक्ष्यांच्या संख्येस आता मांज्यासुद्धा कारणीभूत ठरत आहे. ही बाब सुद्धा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. “











