- पादचारी आणि सायकलस्वार हे घटक देखील शहराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे..
- वाहनचालकांनी देखील वाहतुकीची शिस्त पाळणे गरजेचे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक विकसित केले जात आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच पादचारी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, रस्त्यांचे डिझाईन केले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचा दावा पिंपरी चिंचवड महापालिका करीत आहे. दुसरीकडे अर्बन स्ट्रीट डिझाईनमुळे शहरातील प्रमुख चौकात चक्काजाम होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे अर्बन स्ट्रीट डिझाईन म्हणजे केवळ मनस्ताप असा विचार वाहनचालक करीत आहेत. रस्ता मोठा हवा अशी वाहनचालकांची मागणी आहे. त्यावर गरज निर्माण झाल्यास बीआरटीचा रस्ता आम्ही खुला करण्याचा विचार करीत आहोत. तत्पूर्वी मेट्रोसेवा पुढे मार्गस्त होणे महत्वाचे आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
दरम्यान निगडी ते दापोडी दरम्यान मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार सकारात्मक नियोजन करून, सार्वजनिक वाहतूक, मोटार विरहित वाहतूक आणि सर्वसमावेश पायाभूत सुविधा उभारण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यात दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्याचे सलग पादचारी मार्ग व सलग सायकल मार्ग या संकल्पनेआधारे रस्त्याचे विकसन करण्यात येत आहे. दापोडी-निगडी दरम्यानची वाहतूक कोंडी दूर करणे आणि बीआरटी सेवा सुधारण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. त्याचे दोन टप्प्यात विभाजन केले आहे.
पहिला टप्पा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक ते निगडी भक्ती-शक्ती चौक दोन्ही बाजूस असा आहे. तर, दुसरा टप्पा पिंपरी चौकापासून ते दापोडीपर्यतचा आहे. दापोडी ते निगडी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. बीआरटी मार्ग, एमआयडीसी, एसटी स्थानक, नाशिक फाटा अशा अनेक कारणांनी रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. अनेकदा चौक व सेवा रस्त्यांवर कोंडी होते. याबाबत पाहणी करून, महापालिकेने आराखडा तयार केला. अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार प्रत्येक स्स्त्याला पदपथ, सायकल ट्रॅक, दिवाबत्ती दुरुस्ती, रस्त्याची डागडुजी, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
“महापालिकेतर्फे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काही रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पदपथ, सायकलस्वारांसाठी अद्ययावत व सुरक्षित सायकल मार्ग, दिशादर्शक फलक यांचा समावेश आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
– शेखर सिंह, आयुक्त, महापालिका…
”केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेनुसार २०१८ साली अर्बन स्ट्रीट डिझाईन विकसित करण्याबाबत बैठक पार पडली होती. विचारविमर्शअंती तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी या योजनेला दिशा दिली आहे. आज प्रत्यक्ष अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसित होत आहेत. काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर उपाययोजना करीत आहोत. पादचारी आणि सायकलस्वार हे घटक देखील शहराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. त्यांचाही विचार होणे गरजेचा आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनचालकांनी देखील वाहतुकीची शिस्त पाळणे गरजेचे आहे”…
– बापूसाहेब गायकवाड, शहरी दळणवळण विभागप्रमुख – पिंपरी चिंचवड मनपा…











