- शहरातील डीपी रोड आणि प्रशस्त जंक्शनसाठी आयुक्तांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत विकास आराखड्यातील ३४ डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. अर्धवट रस्ते पूर्ण करण्यात येणार असून, वाहतूक कोंडी होणाऱ्या २५ चौकांची सुधारणा करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने १२ मीटर, १८ मीटर, ३० मीटर आणि २४ मीटर रस्ते विकसित केले जातात. शहरातील रस्ते हे प्रशस्त असले तरी, अनेक विकास आराखड्यातील अनेक रस्ते अर्धवट आहेत, अडवलेले आहेत. ते रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याअंतर्गत ४८.९४ किलोमीटरच्या रस्त्यांवर आठशे कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. आठशे कोटी रुपये खर्च करून ४८.१५ किलोमीटरच्या रस्त्यांचा विकास करण्यात येणार, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
रस्त्यांची यादी..
रावेत-किवळे सीमेवरील १८ मीटर रस्ता, मामुर्डी-किवळे येथील बारा मीटर, मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंपपर्यंतचा रस्ता, मुकाई ते लोढा स्कीमपर्यंतचा बारा मीटर रस्ता, बापदेवनगर किवळेगाव ते एक्स्प्रेस वेपर्यंत, मामुर्डी स्मशानभूमी जवळील रस्ता, समीर लॉन परिसरातील १८ मीटर, भैरवनाथ मंदिर ते विसावा चौक ते आळंदी रस्ता, जाधववाडी सीएनजी गैस पंप ते मार्केटपर्यंत रस्ता या रस्त्यांचा यात समावेश आहे.
रवीरंजन वजन काटा २ ते नाशिक महामार्गापर्यंत रस्ता, पुनावळे येथील बीआरीटी रस्त्यापासून पुणेविलेपर्यंत अठरा मीटर, ताथवडे गावातून जीवननगरमार्गे जाणारा रस्ता, वाकड येथील टीप टॉप हॉटेल ते अटलांटा सोसायटीकडे जाणारा, पुनावळे येथील गायकवाडनगरचा रस्ता, मधुबन हॉटेल ते इंदिरा रस्ता, पुनावळे येथील कोयतेवस्ती ते जांबे गावाकडे जाणारा १८ मीटर रस्ता, पुनावळे मुंबई-बंगलुरू महामार्गापासून काटेवस्तीकडे जाणारा ३० मीटर स्ता, पुणे-नाशिक रस्ता ते सर्व्हे क्रमाक ५७५ येथील रस्ता याचा समावेश करण्यात आला आहे.
मोशी येथील डीपी रस्ता, डुडुळगाव येथील मोशी आळंदी रस्ता, वडमुखवाडी गावठाण ते चर्होली रस्ता, त्रिवेणीनगर ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रस्ता, चिखली ते सोनवणे वस्तीकडे तीस मीटर, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा रस्ता. चिखली चौक ते सोनवणे वस्तीकडे जाणारा २४ मीटर, तळवडेमधील कॅनबे चौक ते स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मीटर रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.
या चौकांमध्ये होणार सुधारणा..
तळवडे, चिखली, भारत मित्र मंडळ चौक, देहू फाटा चौक, नाशिक फाटा, पिंपरी, फिनोलेक्स चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, त्रिवेणीनगर, यमुनानगर, पुनावळे, भुमकर, भुजबळ, दापोडी, भोसरी बस टर्मिनल चौक, गणेशनगर
रस्ते या शहराच्या वाहिन्या आहेत. शहरातील दळणवळण सुलभ व्हावे आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष आराखड़ा तयार केला आहे. त्यानुसार आरक्षणात अर्धवट राहिलेले रस्ते पूर्ण करण्यावर प्राधान्य दिले जाणार आहे. चौकांची सुधारणा करण्यात येईल. त्यातून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
– शेखर सिंह, आयुक्त…










