- मुख्यालय उभारणीची घाई?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलातील एकूण ४१५ पदांपैकी तब्बल ३४९ पदे रिक्त आहेत. या विभागातील एकूण मनुष्यबळाच्या ८४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे शहराची सुरक्षा किमान मनुष्यबळाच्या हाती असल्याचे चित्र आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, विरोध झाल्याने गावडे यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यानंतर अग्निशमन विभागाचा कार्यभार सहाय्यक आयुक्त विजय थोरात यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तर, आता उपआयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संवर्गाचे एक पद, विभागीय अग्रिशमन अधिकारी संवर्गाच्या दोनपैकी एक पद भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया सन २०२२ पासून सुरू आहे. तर विभागीय अग्रिशमन अधिकारी पदोन्नतीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आले आहे. याशिवाय स्टेशन अधिकारी संवर्गाची १२ पदे, उप अधिकारी संवर्गाची २४ पदे तर चालक व पंप ऑपरेटर संवर्गाची ६० पदे भरण्यासाठी या पदांचे सेवा नियम राज्य सरकारकडे पुनरावलोकनासाठी पाठविण्यात आले आहेत. तर अग्निशामक अधिकारी संवर्गाची एकूण २७३ पदे मंजूर असून, या पदावर ३८ अधिकारी कार्यरत असून, २३५ पदे रिक्त आहेत. तर, या संवर्गाची १५० पदे नव्याने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिका प्रशासनाने याशिवाय वरिष्ठ अग्रिशामक अधिकारी संवर्गाची ४० पदे मंजुर असून, २१ पदांवर अधिकारी कार्यरत असून, १६ पदे रिक्त आहेत.
महापालिकेच्या वतीने पिंपरीतील गांधीनगरमधील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. त्यात आठ मजली प्रबोधिनी इमारत, १५ मजली निवासी इमारत, २२ अग्रिशमन बंब बसतील अशी पार्किंग, अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा, संग्रहालय व प्रेक्षागृह असणार आहे. त्यासाठी अदापत्रकात १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाचे मध्यवर्ती मुख्यालय सध्या संत तुकारामनगर येथे आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने नव्या प्रशस्त ठिकाणी मुख्यालय बांधण्याचे नियोजन होते. पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून आय टू आर अंतर्गत मिळालेल्या ५.५ एकर जागेत हे मुख्यालय बांधण्यात येणार आहे. तर निगडीतील हेडगेवार भवन येथे एक एकर जागेत ३० कोटी रुपये खर्चुन ६ अग्रिशमन वाहनांसाठी पाकींग, निवास व प्रशिक्षण मैदानाचे नियोजन आहे.










