- महापालिका इथे उभारत आहे कमान?..
- तीर्थक्षेत्र देहूकडे जाणाऱ्या भाविकांची कमानीमुळे होतेय ‘नाकाबंदी’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२५) :- आळंदी-देहू रस्त्यावरील देहूगावच्या रिंगरोड चौकाजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरू असलेल्या कमान उभारणीचे काम अर्धवट आहे. त्यासाठी रस्त्यातच लोखंडी अँगल उभे केल्याने रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच अपघाताचाही मोठा धोका संभवत आहे.

श्री क्षेत्र देहू – श्री क्षेत्र आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा देहू-आळंदी हा प्रमुख रस्ता आहे. तसेच निगडीहून देहूकडे जाण्यासाठी अनेकजण तळवडे येथून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करतात. चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्कही या मार्गावर असल्याने तेथे वाहनांची संख्या अधिक असते.

सुमारे दोन वर्षापूर्वी देहूच्या रिंगरोड चौकाजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कमान उभारणीचे काम हाती घेण्यात आले. परंतु, ते काम अर्धवट स्थितीत आहे. त्यासाठी तळवडे ते देहू मार्गावर रस्त्यातच मोठे लोखंडी अँगल उभे केले असून त्यामधून एकच वाहन जाईल इतकाच रस्ता शिल्लक आहे. अशातच या रस्त्यावर जलवाहिनीच्या कामासाठी खोदाईही झाली होती. मागील आठवड्यातच या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त लागला. मात्र, कमानीचे काम अद्यापही अर्धवट आहे.
कमानीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. त्याबाबत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात कमानीची एक बाजू खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर एका बाजूचा रस्ता मोकळा केला जाणार आहे. वाहतुकीलाही कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तसेच भाविकांचीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
– विजय भोजने, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका…










