न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. यामध्ये आरोपींनी कोयत्याने वार करीत तरुणाच्या हाताचा पंजा धडावेगळा केला आहे. ही घटना शनिवारी (दि. १८) रात्री साडेबाराच्या सुमारास थेरगाव येथे घडली. पंकज धन्नो सिंग (वय १९, रा. जयभवानीनगर, थेरगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
उपनिरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज शनिवारी रात्री घराजवळ त्याचा मित्र रुपेश सोनवणे याच्यासोबत गप्पा मारत उभा होता. दरम्यान , रुपेशच्या मोबाईलवर आरोपी प्रशांत सोनावणे याचा फोन आला. प्रशांत फोनवर रुपेशला अर्वाच्य भाषेत बोलू लागल्याने पंकजने फोन घेऊन शिव्या देण्याचा जाब विचारला. त्यानंतर काही वेळाने दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने येऊन पंकजला मारहाण करण्यास सुरुवात केली.
कोयत्याचा एक वार हातावर झेलल्याने पंकजच्या हाताचा पंजा धडावेगळा झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


















