न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांमुळे यशवंतनगर, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा (एसआरए) वाद निर्माण झाला आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केला आहे. तर, हा प्रकल्प आहे त्याच ठिकाणी राबविण्याची मागणीही केली आहे.
यशवंतनगर झोपडपट्टीत एसआरए प्रकल्प पिंपरीतील उद्यमनगर गट क्रमांक ७९ येथील स्वप्ननगरी हाउसिंग सोसायटीशेजारी उभारण्यात येणार आहे. हा घाट राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी घातला आहे. तर, यशवंतनगरमध्ये राहणा-या ९० टक्के झोपडीधारकांची त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी आहे, असा दावा पार्टीने केला आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यशवंतनगर झोपडपट्टीचे इतरत्र पुनर्वसन करून, सदरची जागा मूळ मालकाच्या ताब्यात देऊन, तेथे मोठे व्यापारी संकुल बांधून कोट्यवधी रुपये कमावण्याचा डाव आहे, असा आरोप बहुजन पार्टीचे भोसरी विभागाध्यक्ष ईश्वर कांबळे, महिला विभागाध्यक्षा संगीता चौधरी, प्रभागाध्यक्ष निर्मला खरे, यशवंतनगर झोडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष अमोल चौधरी, उपाध्यक्ष नवनाथ इंगळे यांनी केला आहे.











