न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- शैक्षणिक वर्ष २०१९ – २० पासून महापालिकेच्या पंधरा शाळांमध्ये प्राथमिक वर्गांना आठवीचे वर्ग सुरु करण्यास अखेर प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सातवी पास विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न मिटला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षणाला उच्च प्राथमिकचा दर्जा दिला आहे. मात्र, सहा वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शिक्षण विभागाकडून दिरंगाई होत होती.
आता या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे मनावर घेतले आहे. त्यानुसार महापालिकेच्या १५ शाळांनी आठवीचे वर्ग सुरू करण्याविषयी तयारी दर्शविली आहे. प्रशासनाने त्या शाळांची पाहणी केली. त्यानुसार विभागीय पर्यवेक्षकांनी पंधरा शाळांचा अहवाल दिला. त्या अहवालात ज्या परिसरात पालिकेची आठवीची शाळा नाही, अशा प्राथमिक शाळेला वर्गखोल्या उपलब्ध असून, शिक्षक तासवारीनुसार आठवीच्या वर्गास शिकविण्यास तयार आहेत.
त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला जवळच्या शाळेत आठवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी आठवीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत शिंदे यांनी १५ शाळांमधील त्या मुख्याध्यापकांना मान्यता दिल्याचे पत्र पाठविले आहे.


















