न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पिंपरी महानगरपालिकेच्या कारभाराने एमआयडीसीतील उद्योजक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. एसी टॉयलेटची सुद्धा आवश्यकता नसताना भर घातली आहे. जिथे गरज आहे तिथे एकसुद्धा ई टॉयलेट उभारले जात नाही. शहरातील औद्योगिक परिसरात ई टॉयलेट उभारू, असे महापालिकेने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे.
त्याविरोधात उद्योजकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. औद्योगिक परिसरात फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने २०१८ पासून महापालिकेत बैठक घेऊन परिसरातील ई टाॅयलेट, उद्यान, अंतर्गत वाहतूक, कचरापेट्या, सीसीटीव्ही कॅमेरे, एमआयडीसी चौक, सुशोभीकरण व अन्य मागण्या केल्या होत्या.
या बैठकीत तीन महिन्यांमध्ये औद्योगिक परिसरातील ही कामे केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र महापालिकेच्या अधिका-यांना याचा विसर पडला आहे. सायकल योजना, ई टॉयलेट आदींच्या सुविधा अद्याप देण्यात आलेल्या नाही. एकही समस्या महापालिकेने सोडवलेली नाही, अशी माहिती फोरम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.















