- अन्यथा पोलिस बंदोबस्तात कारवाईचा नगरपंचायतीचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १३ मार्च २०२५) :- श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने देहू परिसरात शनिवार (दि.१५) आणि रविवारी (दि.१६) अशा दोन दिवसांसाठी पदपथ आणि रस्त्यावर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
यात्रेनिमित्त पदपथावर तसेच रस्त्यांवर फळे, फूल विक्रेते, खेळणी व इतर साहित्य, खाद्यपदार्थ विक्रेते हातगाड्या लावून तसेच रस्त्यांवरील जागा अडवून विक्री व्यवसाय करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन चेंगराचेंगरी घडण्याची शक्यता आणि पाकीट, मोबाईल, दागिन्यांची चोरी घडण्याच्या घटनाही घडतात.
भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी शनिवार आणि रविवार असे संपूर्ण दोन दिवस पथांवर आणि रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर, देहूगात मुख्य कमान (प्रवेशद्वार) ते १४ टाळकरी कमान तसेच मुख्यमंदिर ते १४ टाळकरी कमान मार्गे वैकुंठगमन मंदिर ते भैरवनाथ चौक दरम्यान पूर्णपणे बंदी केली आहे.
पदपथांवर व्यवसाय करणारे वडापाव, रसवंतीगृह, पान टपऱ्यांसह इतर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नगरपंचायत प्रशासनाने दुकाने, टपऱ्या स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना बुधवारी (दि. १२) दिल्या आहेत. अन्यथा पोलिस बंदोबस्तामध्ये काढण्यात येईल, असा इशारा नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे
















