न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२५) :- गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमवर गायक अरिजित सिंग यांचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. हे बदल रविवारी दुपारी १ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू असल्याचा आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांनी जारी केला आहे.
ज्या वाहनधारकांकडे व्हीव्हीआयपी, व्हीआयपी आणि अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी पास आहेत, त्यांची वाहने द्रुतगती मार्गाच्या उजव्या बाजूने सोडण्यात येतील. मुंबईकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांना देहूरोड एक्झिटमधून डावीकडे वळून मामुर्डीगाव मार्गे, मुकाई चौकातून यूटर्न घेऊन सिम्बायोसिस कॉलेजमार्गे, शितलादेवी मंदिर येथून लेखा फार्ममार्गे स्टेडियमकडे जाता येईल.
देहुरोड सेंट्रल चौकाकडून येणारी वाहने किवळे ब्रीजखालून मामुर्डी अंडरपास मार्गे डाव्या बाजूने जातील. तसेच सेंट्रल चौकातून साईनगर फाटामार्गे पुढे जाणार आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौकमार्गे बंगळूर हायवेवरील मामुर्डी जकात नाकाजवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शीतलादेवी मंदिर येथून मामुर्डीगावात जाता येणार नाही.
पुणे बाजूकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांना किवळे ब्रीजमार्गे द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जाता येईल. निगडी हँगिंग ब्रीजकडून येणारी वाहने कृष्णा चौकातून डुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जातील. गहुंजे पूल ते वाय जंक्शनमार्गे स्टेडियमकडे अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाच प्रवेश असेल. मामुर्डी गावातील रूपहर बिर्याणी ते मासुळकर फार्म बाजूने जाण्यास वाहनांना प्रवेशबंदी असेल. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकात नाकामार्गे जाऊ शकतील.
















