- मावळचे आ. सुनील शेळके यांच्याकडून प्रकल्पाबाबत महत्वाचं भाष्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२५) :- वादग्रस्त पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुनर्जीवित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पावरील स्थगिती शासनाने नुकतीच उठविली आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यासाठी ९५० काेटींचा खर्च अपेक्षित असून, हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.
तर, दुसरीकडे मावळ तालुक्यातून या प्रकल्पाला असणारा विरोध देखील काहीसा मवाळ होताना दिसत आहे. आ. सुनील शेळके यांनी धुलीवंदनाच्या दिवशी आयोजित पत्रकारांच्या संवाद बैठकीत या प्रकल्पाबाबत सकारात्मक भाष्य केले आहे.
ते म्हणाले, ”पवना बंदिस्त जलवाहिनीसाठी शेतकरी सकारात्मक आहेत. परंतु, यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा. एक दोन प्रश्न प्रलंबित आहेत. ते समंजस्याने सुटू शकतात. तसे झाल्यास शक्यतो तीन महिन्यात त्यासाठी हालचाली सुरू होऊ शकतात”.
मावळातील पवना धरणापासून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्याच्या कामावर स्थगिती हाेती. ही स्थगिती गेल्यावर्षी शासनाने उठविली आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही याेजना झाल्यास महापालिका ७६० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा करू शकेल. बाष्पीभवनाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत हाेईल. पाण्याची गुणवत्ता चांगली राहील. पाणी शुद्धीकरणासाठी रसायने कमी लागतील.











