न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पुण्यात एका रिक्षावाल्याला त्याच्या मित्रांना दिलेली पार्टी चांगलीच महागात पडली आहे. बर्गर किंग या प्रसिद्ध ब्रांडच्या FC रोडवर असलेल्या आऊटलेटमध्ये साजित पठाण आणि त्याचे काही मित्र गेले होते. खूप दिवसात मित्रांची भेट झाली नसल्याने साजितने त्याच्या मित्रांसह बर्गर किंगमध्ये भेटायचे ठरवले. मात्र त्याचा हाच निर्णय त्याला सह्याद्री रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पोहचवणारा ठरला. कारण त्याने खाल्लेल्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे होते.
साजितने त्याच्यासाठी आणि मित्रांसाठी ५२१ रूपये खर्च करून बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक्स आणली. त्यानंतर सगळे मित्र गप्पा मारताना बर्गर खाऊ लागले. साजित जेव्हा बर्गर खाऊ लागला तेव्हा काही वेळातच त्याला जोरदार ठसका लागला. त्याचा खोकणे थांबले नाही. त्याच्या तोंडावाटे रक्तही येऊ लागले. त्यानंतर साजितच्या मित्रांनी बर्गर पाहिला. बर्गरमध्ये काचेचे तुकडे होते. या प्रकारानंतर मित्र घाबरले त्यांनी तातडीने साजितला रूग्णालयात आणले. हा सगळा प्रकार बुधवारी घडल्याचे या मित्रांनी सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कलम ३३७ अन्वये बर्गर किंग विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच ज्यादिवशी साजित आणि त्याचे मित्र बर्गर किंगमध्ये पार्टीसाठी गेले होते त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे. प्राथमिक तपासात बर्गरमध्ये काचेचे तुकडे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.