न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पुण्यश्लोक अहल्यादेवी जयंती साजरी केली जाते. मात्र, पालिकेच्या निधीतून एका खासगी संस्थेकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन गेल्या ५ वर्षांपासून केले जात आहे. त्या संस्थेच्या अध्यक्षा भाजप नगरसेविका आहेत. याप्रकरणाची चौकशी करून, संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोमवार (दि. २०) रोजी पत्राद्वारे केली आहे.
पालिकेतर्फे विविध महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. या कार्यक्रमांसाठी क्रीडा-साहित्य व सांस्कृतिक धोरणांतर्गत निधी दिला जातो. या धोरणानुसार पालिका भवनाशेजारात अहल्यादेवी होळकर पुतळा येथे त्यांची जयंती कार्यक्रम पालिका घेते. या कार्यक्रमाअंतर्गत एका संबंधित खासगी मंडळामार्फत पालिका कार्यक्रम घेते. त्या संस्थेस शहरातील धनगर समाजाचा विरोध आहे. या विरोधामुळे मागील वर्षापासून जयंतीचे दोन वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. अध्यक्षपदावर नगरसेविका असतील त्या मंडळाला पालिकेने निधी देणे घटनाबाह्य आहे. तो कायदेशीर गून्हा आहे. हा प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सूरू आहे.
त्या मंडळाची चौकशी करण्यात यावी. मंडळावर कार्यरत असणारे पालिकेचे अधिकारी, सभासद, नगरसेविका आणि पालिकेचे ठेकेदार यांच्या संगनमताने सदर निधीचा गैरवापर झाला आहे. चौकशी करून हे मंडळ धर्मादाय आयूक्तांकडे व त्याचे दरवर्षी लेखापरीक्षण झाले आहे का? याचा तपास करावा. तसेच मागील ५ वर्षात किती निधी दिला याची माहिती द्यावी. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा साने यांनी या पत्रात दिला आहे. तसेच तो निधी मंजूर करण्यापूर्वी पालिका सभेची परवानगी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.











