न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला असताना देखील शहरातील मुलभूत समस्या जैसे थे अवस्थेत आढळून येतात. सत्ताधारी भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी शहरातील नागरिकांवर अनेक आश्वासनांचा पाऊस पडला होता. परंतु, शेवटी ते गाजरच ठरले. प्रभागस्तरीय समस्यांचे अवलोकन केले तरी, या समस्या ठळक स्वरुपात दिसतात. कचऱ्याच्या निविदेतही भ्रष्टाचार करण्यास सत्ताधारी व प्रशासन मागेपुढे पाहत नाही.
वाकडमधील कस्पटे वस्ती परिसरात घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी येणारी महापालिकेची घंटागाडी प्रभागात वेळेत पोहोचत नाही. आठवड्यातून दोन ते तीन दिवस घंटागाडी प्रभागात फिरकतच नाही. त्यामुळे कचरा जाग्यावर पडून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी ”ड” प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वाकड (कस्पटे वस्ती) येथील निसर्ग सिटी ते छत्रपती चौक या परिसरत कचरा गाडी (घंटागाडी) अनियमित येत असल्यामुळे या परिसरातील रहिवाशी त्रस्त आहेत. या भागामध्ये कचरा गोळा करणारी गाड़ी ३ ते ४ दिवसांच्या अंतराने येते. त्यामुळे तेवढे दिवस येथील रहिवाशांना अस्वच्छतेला, दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. कचऱ्यामुळे या भागामधील वातावरण अस्वच्छ होत असून, येथील रहिवाश्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कचरा गोळा करणारी घंटागाडी नियमित व नियोजित वेळेत या परिसरात पोहोचावी, यासाठी आपण तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा परिसरातील रहिवाश्यांना नागरी आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात.











