न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आयुक्तालय स्तरावरील शांतता समितीची सोमवारी (दि. ७) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, आ. उमा खापरे, आ. अमित गोरखे, आ. शंकर जगताप, आ. बाबाजी काळे यांचेसह वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, प्रदिप जांभळे पाटील, अति. आयुक्त मनपा पिंपरी चिंचवड हे तसेच शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शांतता समितीच्या सदस्यांनी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले तसेच सुचना मांडल्या.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सदस्यांनी मांडलेल्या सुचना पोलीस ठाणे अधिकारी यांना देण्यात येतील, असे सांगितले. तसेच आयुक्तालयाचे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज असल्याचे सांगितले. धार्मिक व जातिय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे. सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त गुन्हे / विशेष शाखा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तर, बापु बांगर, पोलीस उपायुक्त वाहतुक यांनी आभार मानले.