- निरामय हॉस्पिटल सील करण्याची प्रक्रिया सुरू..
- जुलैतील स्थगितीनंतर पुन्हा ताबा घेण्याची प्रक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडे गहाण असलेल्या चिंचवड येथील निरामय हॉस्पिटलच्या मालमत्तेवर अखेर पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. हॉस्पिटल सील करण्यासाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे पथक पोलिस बंदोबस्तात दाखल झाले असून, मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात ताबा घेण्यासाठी पथक आले होते. मात्र, त्यावेळी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू असल्याने मानवतावादी दृष्टिकोनातून कारवाई स्थगित करण्यात आली होती. रुग्णालय प्रशासनाला नवीन रुग्ण दाखल न करण्याच्या सूचना देत आवश्यक मुदतही देण्यात आली होती.
मुदत संपल्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने बुधवारी पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत हॉस्पिटल सील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या कारवाईनंतर रुग्णालय प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.


















