न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- विकासनगर, किवळे येथील जागेच्या विकासकामाच्या करारास विलंब होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टला रेस्टॉरंटजवळून कारमध्ये जबरदस्तीने बसवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या एचडीएफसी बँकेच्या कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सही घेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी रावेत पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सुरज नाथाजी पाटील (वय ३१, रा. रावेत) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाकांत तिवारी (रा. किवळे), मुस्सा गौस शेख (रा. देहूरोड) तसेच तिवारी यांच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे आर्किटेक्ट असून विकासनगर, किवळे येथील जागा विकसित करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांशी त्यांची ओळख होती. या जागेबाबत शिवाकांत तिवारी आणि जागामालक यांच्यात डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट करण्याचे काम पाटील यांच्या माध्यमातून सुरू होते. मात्र, काही कारणांमुळे करार करण्यास विलंब होत होता. यावरून तिवारी यांनी यापूर्वीही पाटील यांना दमदाटी केली होती.
२९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिवारी यांनी फोन करून पाटील यांना रावेत येथील कन्नु की चाय रेस्टॉरंटजवळ बोलावले. तेथे डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटला विलंब का होत आहे, अशी विचारणा करत दमदाटी करण्यात आली. त्यानंतर तिवारी, शेख आणि चालकाने पाटील यांना टोयोटा हाय रायडर कारमध्ये जबरदस्तीने बसवले. कारमध्ये मारहाण करून त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सही घेण्यात आली. त्यानंतर त्यांना विश्रांतवाडी, पुणे येथे सोडण्यात आले.
याप्रकरणी रावेत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टार्फे करीत आहेत.


















