- आ. अमित गोरखे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून उपचारात हलगर्जीपणा झाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या समितीच्या पहिल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर टाच आणावी, अशी मागणी भाजप आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.
आ. अमित गोरखे म्हणाले, ‘डॉ.घैसास यांनी पाच तास रुग्णाला थांबवून ठेवले. कोणतेही उपचार केले नाहीत. त्यामुळे प्राथमिक अहवालात डॉ.घैसास आणि त्याचा चमू दोषी असल्याचे स्पष्ट होत आहे. रुग्णाचा वैद्यकीय इतिहासाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रसिद्ध केला आहे. हे चुकीचे असून अहवालात त्याबाबतही ठपका ठेवला आहे. मंगेशकर कुटुंबाने ज्या उद्गात हेतूने रुग्णालय सुरू केले आहे. तो हेतू अनेकवेळा साध्य केला आहे. अनेक गरिबांना न्याय मिळाला आहे. उपचार मिळाले आहेत. मात्र, डॉ.घैसास आणि त्यांच्या चमूमुळे काळा डाग लागला आहे’.
‘या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली. समिती नेमली. दोन्ही बाळांच्या रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही फडणवीस यांनी स्वीकारली आहे. बाळांचे संगोपन करण्यास आम्ही समर्थ आहोत. परंतु, माणुसकी म्हणून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत दोन्ही मुलींच्या संगोपणाची जबाबदारी घ्यावी. धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यूचा यमुना जाधव यांचा हे दोन अहवाल लवकरच येतील. तिन्ही अहवाल एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना सादर केले जातील. त्यानंतर डॉ.घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचा रुग्णालय प्रशासनावर रोष नसून डॉ. घैसास यांच्यावर आहे. त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरही टाच आणली पाहिजे’, अशी मागणी आमदार गोरखे यांनी केली.
दरम्यान पुणे, बालेवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार अमित गोरखे यांनी पीडित भिसे कुटुंबासहित नुकतीच भेट घेतली. मुख्यमंत्री यांनी सर्व विषय समजून घेऊन संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती विचारली व आश्वासित केले की या प्रकरणात लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल. त्याप्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.