न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा योजना राबविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ १२८ आहे. तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. या १३३ नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्यात आला आहे.
मात्र, १२८ नगरसेवकांपैकी सात नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास यापुर्वीच नकार दर्शविला आहे. त्यामुळे १२१ अधिक पाच स्वीकृत अशा १२६ नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या २१ वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे.
या योजनेसाठी २८ लाख ६४ हजार ८६५ रुपये खर्च होणार आहे. या योजनेस स्थायी समितीने आज ( मंगळवारी) झालेल्या सभेत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.