- डी.पी. सुनावणीत मुस्लिम समाजाची नाराजी!..
- चिखली-कुदळवाडीतील कब्रस्तानाचा मुद्दा ऐरणीवर…
न्यूज पीसीएमसी NETWORK
पिंपरी-चिंचवड, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : चिखली-कुदळवाडी परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या जागेचा विकास आराखड्यात (डी.पी. प्लॅन) पूर्णपणे समावेश करण्याच्या मागणीवरून सुनावणीदरम्यान नाराजी व्यक्त करण्यात आली. कब्रस्तानासाठी खासगी जागेचा पर्याय सुचविल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

मुस्लिम समाजाची मागणी खासगी मालमत्तेसाठी नसून, कब्रस्तानासाठी मंजूर असलेल्या महापालिकेच्या जागेचा विकास आराखड्यात योग्य समावेश करण्याची आहे, असे नागरिकांनी स्पष्ट केले.
वाढती लोकसंख्या आणि दफनभूमीची गरज लक्षात घेता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत पर्याय सुचविण्याऐवजी संबंधित जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
कब्रस्तानाच्या जागेचा डी.पी. प्लॅनमध्ये समावेश करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक व सामाजिक गरजांचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी मंजूर असलेल्या महापालिकेच्या जागेचा डी.पी. प्लॅनमध्ये योग्य समावेश होणे आवश्यक आहे. अशा मूलभूत सुविधेसाठी खासगी जागेचा पर्याय सुचविणे योग्य नाही. नागरिकांच्या धार्मिक आणि सामाजिक गरजांचा आदर करून महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घ्यावी आणि कब्रस्तानाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.” — नरेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष, काँग्रेस, पिंपरी-चिंचवड…


















