न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २९ डिसें.) :- चिखलीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे भंगार मालाची दुकाने आणि गोदामे सुरू केली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर भंगार जाळले जात आहे. त्यातून वारंवार आगीच्या घटना घडत आहे.
याबाबत पर्यावरण आणि भंगार मालाच्या गोदामांसंदर्भात महापालिकेत नुकतीच बैठक झाली होती. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी भंगार व्यावसायिकांना नोटीसा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अनधिकृत बांधकाम निर्मुलन पथकास कारवाईचे आदेश दिले होते.
सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संजय खरात, प्रकाश साळवी, हेमंत देसाई, शिवाजी चौरे, नितीन निंबाळकर, चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर तसेच महापालिकेचे ८ कनिष्ठ अभियंता, १५ बीट निरिक्षक, अतिक्रमण व निर्मूलन पथक, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, ८० पोलीस कर्मचारी यांनी कारवाई करीत अनधिकृत भंगार मालांच्या गोदामांवर बुल्डोजर फिरवला. या धाडसी कारवाईमध्ये दहा एकर जागेतील ९० अनधिकृत गोदामे अतिक्रमण पथकाने भुईसपाट केली.