न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए) कंपनी सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे अतोनात हाल होत असून, त्यांचे पगारसुद्धा रखडलेले आहेत. यातून मार्ग काढणे जरुरीचे आहे. अन्यथा अनेक कामगारांचे संसार उध्वस्त होतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने एच. ए. कंपनीच्या जागांची खरेदी करण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून, त्यात म्हटले आहे की, ”आजारी उद्योग म्हणून कंपनीस पून्हा नवसंजीवनी देण्याकरीता केंद्रीय आजारी उद्योग पुनर्वसन मंडळाच्या (बीआयएएफआर) च्या वतीने कंपनीच्या मालकीच्या ६० एकर जागेपैकी २० एकर जागा खुल्या निविदेद्वारे विक्रीस परवानगी देण्यात आलेली होती. परंतु, २० एकर जागेचे चार तुकडे करून, प्रत्येकी पाच एकर या दराने निविदा काढण्याचा विचार या समितीद्वारे चालू होता. त्यामुळे स्पर्धात्मक स्वरूप येऊन किंमत अधिक मिळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
पिंपरीतील कंपनीच्या जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. या जमिनींचे विक्री मूल्य निवासी पद्धतीने न ठरवता, औद्योगिक क्षेत्रातील मूल्यांकन पद्धतीने ठरविण्याची गरज आहे. तसेच या जमिनीची विक्री खाजगी विकसकास न करता, महानगरपालिकेने या जागा विकत घेण्यास पुढाकार घ्यावा. महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. महापालिकेच्या इमारतीतील पार्किंगची सुविधा अपुरी पडत आहे. महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा वाढता बोजा महापालिकेवर पडत आहे. त्यामुळे महापालिकेने एच. ए. कंपनीची जागा खरेदी करून, त्याठिकाणी प्रशस्त इमारत उभारावी. तसेच उर्वरित जागेवर शहरातील तरुण उद्योजकांसाठी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सही उभारले जाऊ शकते. त्यातून मोठ्या प्रमाणात भांडवलाची निर्मिती होऊन रोजगार वाढण्यास मदत होईल.
सध्या या मोकळ्या जागेचा वापर कंपनीकडून प्रदर्शनास व इतर कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याकरीता होत आहे. तसेच इतर जागेचा वापर फक्त कचरा टाकण्यासाठी होतो आहे. एच. ए. कंपनीच्या या जागेंचा वापर योग्य कारणासाठी झाला तर, त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यात अनेक कामगारांचे संसार मार्गी लागतील. विकून येणाऱ्या भांडवलातून कंपनीसुद्धा पुन्हा नव्या जोमाने उभी राहील व कामगारांचे प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात सुटतील. तसेच परत कोणी कामगार आत्महत्याही करणार नाही, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.