- आ. अमित गोरखे यांची बैठकीत मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व महा मेट्रोमार्फत पुणे प्रादेशिक क्षेत्राकरिता शाश्वत दळणवळण विकास आराखडा (Comprehensive Mobility Plan) तयार करण्यासाठी माजी नगरसेवक व पक्षाच्या प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या आराखड्या अंतर्गत पुणे शहर व पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील मेट्रो, बीआरटी, एसटी, बस सेवा, रस्ते वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग सोल्यूशन्स, पायाभूत सुविधा, आणि इतर शाश्वत दळणवळण प्रकल्पांचे समन्वयित नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे मेट्रो प्रकल्पाचे संचालक अतुल गाडगीळ, आ. अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक नामदेव ढाके, संदीप वाघेरे, सचिन चिखले आदी उपस्थित होते. बैठकीत विविध घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील उपाययोजना, नियोजन आणि विकास आराखड्यांवर महत्त्वपूर्ण मते मांडण्यात आली.
दरम्यान बैठकीत आ. अमित गोरखे यांनी प्रस्तावित निगडी-चाकण मार्गाबाबत (वाकड, नाशिक फाटा, मोशी मार्गे), पुणे मेट्रोने लाईन ३ शिवाजीनगर-हिंजवडी मार्गासाठी वापरलेले तंत्रज्ञान (Third Rail) वापरल्यास, निगडी आणि चाकण भाग थेट विद्यमान हिंजवडी मार्गाशी जोडणे शक्य होईल. यामुळे वाकड येथे इंटरचेंजची आवश्यकता भासणार नाही. दोन मार्गांचा अ) हिंजवडी ते चाकण (मार्गे वाकड, डांगे चौक, रावेत, मुकाई चौक, निगडी, तळवडे, चाकण एमआयडीसी), ब) हिंजवडी ते चाकण (मार्गे वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी, मोशी) विचार व्हावा. अथवा निगडी ते चाकण व्हाया वाकड, भोसरी या मार्गासोबतच निगडी ते चाकण व्हाया रुपीनगर, तळवडे, म्हाळुंगे, खराबवाडी हि मिसिंग लिंक सुद्धा विकसित करावी जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराभोवती एक रिंग मेट्रो तयार होईल. पीसीएमसी आणि पीएमसी एचसीएमटीआर हे ठाणे रिंग मेट्रोप्रमाणे नियमित मेट्रो लाईन्स म्हणून विकसित केले पाहिजे. निधीअभावी हे शक्य नसल्यास प्रस्तावित एचसीएमटीआर निओ मेट्रो मार्गांना त्वरित मंजुरी मिळून युद्धपातळीवर काम सुरू झाले पाहिजे. निगडी ते वाघोली मार्गाच्या डीपीआरचे काम त्वरित सुरू करावे. हा मार्ग निगडी ते वाघोली असा असून तो चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, विश्रांतवाडी, धानोरी आणि लोहगावमार्गे जाईल. याच मार्गाला विश्रांतवाडी ते जिल्हा न्यायालय अशी Spur Link तयार करता येईल. स्वारगेट हबच्या धर्तीवर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुसज्ज मल्टीमॉडल हब विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. या हबमध्ये मेट्रो, बीआरटी, पीएमपीएमएल बसेस, राज्य परिवहन बसेस, खाजगी बसेस आणि रिक्षा यांसारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीचे एकत्रीकरण केले जाईल. मल्टीमॉडल हबमध्ये भरपूर पार्किंग, चार्जिंग स्टेशन्स, प्रसाधनगृहे, कॅफे, मनोरंजन क्षेत्र आणि डिजिटल साइनेज असावेत. मेट्रो स्टेशन्सना रेल्वे ट्रॅकवरून ओलांडून शहराच्या इतर भागांशी जोडण्यासाठी स्कायवॉक पूल बांधावेत. संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी या मेट्रो स्थानकांवर स्कायवॉक बांधता येतील. तसेच, चिंचवडमधील मेट्रो आणि रेल्वे स्थानकांना स्कायवॉकने जोडावे. पीएमपीएमएलचे नियंत्रण पुणे मेट्रोसारख्या सक्षम प्राधिकरणाकडे सोपवावे. मेट्रो स्थानकांमध्ये पार्किंग ही एक प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोने पीएमसी आणि पीसीएमसीच्या सहकार्याने एक व्यापक पार्किंग धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. पार्किंग शुल्क सध्याच्या रेल्वे स्टेशन पार्किंग भाड्याशी सुसंगत असावे. मेट्रो स्टेशन्सपासून शहराच्या अंतर्गत भागांपर्यंत फीडर मार्ग तयार करावेत. या मार्गांवर किमान दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध असावी.
पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा मीटर नियमांचे पालन करत नाहीत आणि शेअर रिक्षा मार्गांमध्ये गैरव्यवस्थापन आहे. वाहतुकीचे हे दोन्ही मार्ग सध्या प्रवाशांना सोयीचे नाहीत. जर आरटीओ रिक्षा आणि शेअर रिक्षा प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकत नसेल, तर चांगल्या नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी ही जबाबदारी पुणे मेट्रोकडे सोपवावी. राज्य सरकारच्या धोरणानुसार, पुणे मेट्रोने ई-बाईक आणि ई-रिक्षा ऑपरेटर्सना आणि चालकानना सक्रियपणे प्रोत्साहन द्यावे. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या घर आणि कार्यालयापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पुणे मेट्रो अॅप-आधारित बुकिंग सिस्टमद्वारे या ऑपरेटर्सना मदत करू शकते. लांब पल्ल्याच्या एसटी आणि खाजगी बसेस जवळच्या मेट्रो स्टेशनशी जोडाव्यात, अशा सूचना बैठकीत केल्या आहेत.