- मुंबई उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप; तात्काळ जमीन ताब्यात घेण्याचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- वाकड-बालेवाडी पूल बांधकाम होऊन १० वर्षे झाल्यानंतरही सार्वजनिक वापरासाठी बंदच आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घ्यावा व त्याबाबतची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. हा पूल जनतेकरिता खुला करण्याची प्रक्रिया जलद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
वाकड येथील रहिवासी अभिजित गरड आणि बालेवाडी येथील रहिवासी संदीप मांडलोई यांनी अॅड. सत्त्या मुळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
पुणे मनपातील बाणेर आणि बालेवाडी, पिंपरी चिंचवड महापालिकेतील वाकड, कस्पटे वस्ती आणि इतर परिसर मुळा नदीमुळे वेगळा झाला आहे. बहुतांशी नागरिक वाकडमध्ये राहतात आणि बाणेर, बालेवाडी आणि येथे काम करतात आणि याउलट बाणेर-बालेवाडी येथे राहणारे लोक वाकडमध्ये कामास जातात. सद्यपरिस्थितीत त्यांना केवळ मुंबई-बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या ‘खूप लांब आणि दूरच्या मार्गावर’ अवलंबून रहावे लागत आहे. बालेवाडी, बाणेर आणि वाकड यांना जोडणारा मुळा नदीवरील पूल २०१३ मध्ये पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांनी संयुक्तपणे मंजूर केला होता. पूल तयार झाला आहे, पण लगतचे भूसंपादन रखडले.
वाकड बालेवाडी हा पूल बऱ्याच विलंबाने बांधण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये ३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह तयार झाला आहे. असे असतानाही हा पूल अद्याप सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध झालेला नाही. पुलाच्या बालेवाडीच्या बाजूस विद्यमान रस्त्यांशी हा पूल जोडलेला नाही. या समस्येमुळे या भागातील २ लाख ५० हजारपेक्षा जास्त रहिवासी आणि पुणे जिल्ह्यातील रहिवासी प्रभावित होत आहेत. यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भार अनावश्यकपणे वाढत आहे, ज्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत, वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या बालेवाडी ते वाकड पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झालेले नाही. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या केवळ सहा ते सात गुंठे जागेचे भूसंपादन रखडल्यामुळे २३ कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या पुलावरून अद्यापही वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे बाणेर, बालेवाडी, वाकड या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरित यावर विचार होणे अपेक्षित आहे. या पुलाची लांबी २३६ मीटर तर रूंदी ३० मीटर असून सात स्पॅन आहेत.
















