न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- मावळ लोेकसभा मतदारसंघात असलेल्या लोहगड किल्याच्या पायथ्याशी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवस्मारकाचे काम तातडीने हाती घ्यावे, त्याला गती द्यावी. गडावरील महादेवाच्या मंदिराचा जिर्णोधार करावा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुरातत्व विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.
तसेच लोहगडाचा जागतिक वारसा स्थळात लवकरच समावेश होणार असल्याची माहितीही खासदार बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी गुरुवारी लोहगड किल्याला भेट दिली. पूर्ण गडावर फिरुन पाहणी केली. गडावर चाललेल्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे अधिकारी गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन टेकाळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, माजी सभापती गणेश धानीवले, अलका धानीवले, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, अमित कुंभार, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे, सरपंच सोनाली बैवरे, उपसरपंच पंढरीनाथ विखार, सुनील हगवणे, मुन्ना मोरे, दत्ता केदारी, कमलेश शेळके, सचिन भोरडे, नितीन देशमुख, राजू गुजर आदी उपस्थित होते.
किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहे. लोहगडासह मावळात विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले आहेत. जवळच लोणावळा, भाजे लेणी आहे. त्यामुळे किल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन वाढीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गड किल्ल्यांवर येणारे शिवप्रेमी, शिवभक्त, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.