न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२५) :- चिखली-मोशी परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून नियम डावलून कामकाज सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी जिथे इमारतीचे काम सुरू तिथे ग्रीन नेट सक्तीचे केले आहे. मात्र, हा नियम धुडकावल्याचे चित्र चिखली-मोशी परिसरात दिसत आहे. परिणामी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.
चिखली परिसरात काही गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ग्रीन नेट न बसविल्याने आजूबाजूच्या वसाहतीमधील नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. इमल्यावर इमले चढवले जात असताना मात्र त्याचा त्रास पर्यावरण आणि आजूबाजूच्या नागरिकांना होत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, रात्री दहानंतरही बांधकाम केले जात आहे. महापालिका प्रशासन एकीकडे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. तर, दुसरीकडे काही बांधकाम व्यावसायिकांकडून सर्रास नियम डावलून काम सुरू आहे. त्यांच्यावर महापालिका प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्या इमारतींना ग्रीन नेट बसवणे अत्यावश्यक आहे. इमारत कापडाने झाकली तर धूळ, माती हवेत उडत नाही. हा नियम बांधकाम विभागाचा आहे. या नियमाचे पालन होत नसल्यास पर्यावरण विभागाच्या स्कॉड पथकाकडून कारवाई केली जाते. ज्या ठिकाणी असे निदर्शनास येईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग..
जिथे इमारतीचे बांधकाम सुरू असते त्या इमारतीच्या परिसरात सतत धूळ आणि सिमेंट उडत असते. या सिमेंट आणि धुळीचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्यांना होऊ शकतो. उडणाऱ्या धुळीचा त्रास होऊ नये यासाठी बिल्डींग ही हिरव्या रंगाच्या कापडानं झाकली जाते. इमारत कापडाने झाकल्याने धूळ, माती ही हवेत उडत नाही. तसेच, प्रदूषण होत नाही. हे बांधकाम परवाना विभागाचे नियम आहेत. त्या नियमाचे पालन बांधकाम व्यावसायिकांनी करणे आवश्यक आहेत. ज्या ठिकाणी नियम धुडकावले जातील, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका…
















