- नागरिकांवर तास न तास रांगेत उभे राहण्याची वेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २९ मे २०२५) :- मागील काही दिवसांपासून निगडी येथील सेतू सुविधा केंद्रांतील सर्व्हर ‘डाउन’ झाला आहे. परिणामी दाखल्यांसाठी येणाऱ्यांची गैरसोय होत असून, त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. बऱ्याच दिवसांपासून तांत्रिक समस्या येत असतानाही यंत्रणेत सुधारणा न झाल्याने प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशाची लगबग सुरू असतानाच झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे गोंधळाची स्थिती आहे.
निगडी येथील सेतू सुविधा केंद्रातून एका छताखाली सर्व सुविधा मिळतात. अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी सेवा या केंद्रांद्वारे दिल्या जातात. येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे रांगा लागतात. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रात सर्व्हर डाउन असल्याने कर्मचाऱ्यांसह विविध कामांसाठी येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्व्हर डाउन असल्याने प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात अडचणी येत आहेत. प्रमाणपत्र किंवा दाखला घेण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत. सुविधा केंद्रांतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रमाणपत्रे मिळवताना मनस्ताप होत आहे. पालक व विद्यार्थ्यांची दाखले काढण्यास धावपळ होते. त्यात एकदम सर्व्हरवर ताण येतो. त्यामुळे सर्व्हर बंद पडते. दरवर्षी हे ठरलेलेच आहे. मे-जून महिन्यांत सगळ्या सेतू केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. पण याची दखल कोणीच घेत नसल्याचे चित्र आहे.
महाआयटीच्या वेबसाइटवर जास्त ताण येत आहे. त्यामुळे सर्व्हर अधूनमधून बंद पडत आहे. त्यातच हवेली तालुक्याचा परिसर मोठा असून, दाखल्यांची मागणी जास्त आहे. परिणामी दाखले देण्यास उशीर होत आहे.
– जयराज देशमुख, तहसीलदार…











