- हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात समिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२५) :- पुण्यातील हगवणे कुटुंबाकडून सतत होणारा छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर हुंडा हा विषय राज्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील लग्नासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, सुरेश भोईर, नाना काटे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सतीश दरेकर, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, अनिल तागडे, सचिन कोंडे, सचिन साठे, अतुल शितोळे, एन. बी. भोंडवे, मधुकर चिंचवडे, धोंडीबा भोंडवे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाजाची भविष्यातील वाटचाल व त्यासंदर्भात काही धोरणे या वेळी निर्धारित करण्यात आली. वैष्णवी प्रकरणानंतर तशी वेळ मराठा समाजातील इतर मुलींवर येऊ नये, यासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. लग्नव्यवस्थेबरोबरच इतर कार्यक्रम, समारंभाबाबतीतही आचारसंहिता निश्चित करण्यात आली.
समाजाची असणार करडी नजर…
ज्या ठिकाणी हुंडा दिला आणि घेतला जाईल, त्या कुटुंबाला वेळीच जरब बसवून होणारा आर्थिक खर्च टाळला जाणार आहे. अशा सर्व प्रकारावर सकल मराठा समाजाची करडी नजर असेल. कोणत्याही परिस्थितीत हुंड्याची प्रथा हद्दपार करण्याचा निर्धार समाजाने केला असल्याची माहिती आयोजकांनी माध्यमांशी बोलताना दिली.