- राज्यात तीन टप्प्यात उडणार निवडणुकांचा धुराळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०७ जून २०२५) :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यामध्ये निवडणूक आयोगाची तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय नियोजनानुसार तीन टप्प्यांत निवडणूक घेण्याचे नियोजन करत असत्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील 20 मनपा 257 नगरपालिका, 20 जिल्हा परिषद आणि 288 पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होतील एकूणच निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागेल म्हणून ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेता येतील, असे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवते होते. त्यात जूनअखेरपर्यंत वॉर्ड, प्रभाग तसेच गण गट रचना करून घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. निवडणूक आयोगानुसार पहिल्या टप्प्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसऱ्या टप्प्यात, मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान व्हावे, अशी आखणी केली आहे.
एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमची गरज भासणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त ६५ हजार ईव्हीएम असल्यामुळे तीन टप्प्यात निवडणूक घेण्याची तयारी आयोग करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी पावसाचाही अंदाज घेतला जाणार आहे. त्यानुसार त्यासाठी हवामान खात्याच्या तज्ञ अधिकाऱ्याशी चर्चा करण्यात येईल, असे वाघमारे म्हणाले.