- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा विकास सुनियोजित विकास करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संभ्रम करण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिला होता. त्यामुळे योजना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी रद्द केली आहे. महापलिकेच्या सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
महापालिका प्रशासनाने चऱ्होली येथे TP Scheme प्रस्तावित केली होती. त्याला शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला होता आणि पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी लावून धरली होती. तसेच, आंदोलनही करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी, महापलिका आयुक्त शेखर सिंह यांनी चऱ्होली TP Scheme प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र, स्थगिती नको, रद्द करा… अशी मागणी भूमिपुत्रांनी केली होती. तसेच, TP Scheme वरुन राजकीय संभ्रम निर्माण करण्यात येत होता. या पाश्वभूर्मीवर आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर कार्यक्रमात लक्ष वेधले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चऱ्होलीची TP Scheme रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे चऱ्होली आणि पंचक्रोशीतील भूमिपुत्र, शेतकरी, स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवडकरांच्या न्यायहक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. चिखली TP Scheme रद्द करण्यात आली. पण, महापालिका प्रशासनाने चऱ्होलीच्या बाबतीत कार्यवाहीला स्थगिती अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकीय संधीसाधुंनी भूमिपुत्र, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एक घाव दोन तुकडे’ भूमिका घेतली आणि चऱ्होलीची TP Scheme रद्दची घोषणा केली. भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा…