न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २० जून २०२५) :- उल्हासनगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाजवळ गणपती मंदिर परिसरात अभिमान तायडे हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईहून घरी येताना वाटेतच ते अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांच्या मुलाने एका रिक्षाने उल्हासनगर गाठत शिवनेरी रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथील डॉ. प्रभु आहुजा यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. इतकेच नव्हे तर तातडीने त्यांचे डेथ सर्टिफिकेटही दिले. त्यामुळे नातेवाईकांनी एकच हंबरडा पह्डत तायडे यांचे ‘पार्थिव’ घरी आणले. आजोबांची अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच चक्क ताडकन उठून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तायडे गेल्याची खबर मिळताच त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक घराजवळ जमा झाले. आप्तेष्टांची रडारड सुरू होती. बाहेर एका बाजूला तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. खिडकीतल्या एका कोप-यात त्यांना घालण्यासाठी आणलेले हार लटकत होते. त्याचवेळी अचानक तायडे यांची छाती धडधडत असल्याचे लक्षात आले आणि लागलीच नातेवाईकांनी त्यांना साई क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू केले. काही वेळाने तायडे शुद्धीवर आले. त्यामुळे शोकाकुल घरात आनंदाचे भरते आले.
याबाबत खुलासा करताना आहुजा म्हणाले, चूकच झाली. रुग्णाची नस मिळाली नाही. त्यातच आजूबाजूला प्रचंड गोंगाट असल्याने तायडेंच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, अशी अजब सारवासारव त्यांनी केली. मात्र रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱया आहुजांवर कडक कारवाई करा, अशी मागणीच तायडे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.