- शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकरांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 27 जुन 2025) :- चिंचवडगावातील रस्टन कॉलनी आणि एस. के. एफ. कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि निवारा शेड उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, चिंचडगावातील रस्टन कॉलनी आणि एस.के.एफ. कॉलनी या दोन्ही कामगार वसाहती आहेत. येथे मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. विरंगुळा केंद्र नसल्याने येथील जेष्ठांची मोठी कुचंबणा होते.
सकाळी, संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी एकत्रितपणे बाहेर पडलेल्या जेष्ठ नागरिकांना येथील पदपथावरच बसावे लागते. त्यामुळे ज्येष्ठांची गैरसोय होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागणीची दखल घेऊन जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि निवाऱ्याकरिता शेडची उभारणी करून द्यावी. त्यामुळे त्यांची सोय होईल, असे या निवेदनात संतोष सौंदणकर यांनी म्हटले आहे.











