न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी शनिवार (२८ जून) व रविवारी (२९ जून) या दोन्ही दिवशी मालमत्ता कर भरण्यासाठी कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सुरू राहतील, अशी माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी ३० जून २०२५ पर्येंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांमार्फत मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची बिलं वेळेत वाटप करण्यात आली आहेत. तसेच, सवलतीबाबत माहिती पोहचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून वारंवार एसएमएस, कॉलिंग, जनजागृती मोहिमा, होर्डिंग्स व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत जनजागृती करण्यात येत आहे.
प्रत्येक विभागीय कार्यालयातून सहायक मंडल अधिकारी आणि गट लिपिक मालमत्ताधारकांशी थेट संवाद साधून त्यांना कर भरण्याचे आवाहन करत आहेत. या प्रयत्नांमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेरीस ४३८ कोटी रुपयांचा कर भरणा झाला आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस विविध सवलती जाहीर केल्या जातात. यंदाही या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक मालमत्ताधारक उत्स्फूर्तपणे पुढे आले आहेत. ऑनलाईन कर भरणा सुविधेअंतर्गत सेवा उपलब्ध असल्या तरीही अनेक नागरिक रोखीने कर भरणा करतात. यामुळे कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन शनिवार, रविवारही कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या योगदानाने शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
















