न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२५) :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठ्याकरिता नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या त्या भागातील संबंधित वीज पुरवठा विभागाकडून मीटर बदलले जात आहेत. मात्र जे मीटर बदलले त्यातील काही नागरिकांना पहिल्या बिलामध्येच मोठ्या प्रमाणात वाढीव बिल आलेले आहेत.
हजार रुपये बिल येत होते तिथे दीड हजार, दोन हजार त्याही पेक्षा जास्तची बिल आले आहेत. सध्या मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शाळेचा खर्च, अचानक वाढलेले लाईट बिल, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वेळेवर बिल भरले नाही तर, लाईट कट करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे नागरिक हतबल आहेत.
पूर्णानगर येथील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन संबंधित अधिकारी मुंडे साहेब यांना वाढीव लाईट बिल जमा करून देण्यात आली. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कॉम्प्युटरवर बिल चेक करून दाखवले. त्यांच म्हणणं आहे की, जुने मीटर हे फॉल्टी होते. त्यामुळे स्लो चालत होते. त्यामुळे बिल कमी येत होत.
याबाबत नागरिकांचे म्हणणे आहे की
मीटर आम्ही बाजारातून खरेदी करून आणलेले नाहीत. मीटर हे आपल्याकडूनच बसवलेले आहेत. मग ते फॉल्टी कसे? यामध्ये आमची काय चुकी आहे? जे नवीन बसवले आहेत ते तरी चांगले असतील कशावरून, अचानक वाढीव रक्कम नागरिक भरणार कसे, याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यानी जनसंवाद घ्यावा व नागरिकांच्या शंकेचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्याचे रूपांतर मोर्चात होईल, याची नोंद घ्यावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी नक्षत्र फेज २, सोसायटीचे सेक्रेटरी अजय संभाजी पाताडे, उपाध्यक्ष पंकज निकम, राजेश नागरे, सतीश श्यालेन, तसेच इतर सोसायटीतील सभासद व नागरिक उपस्थित होते.
















