न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- ‘ई-चालान’ कार्यप्रणालीविरोधात असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स पुणे यांच्या वतीने बुधवार (दि. २) पासून पुकारलेल्या बेमुदत चक्का जाम आंदोलनात पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे दोन हजार ट्रकमालकांनी सहभाग घेतला.
आंदोलनामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, औद्योगिक कंपन्यांनाही एका दिवसात आर्थिक फटका बसला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. जिथे ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग आणि उत्पादन क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या चक्का जाममुळे मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. कच्चा माल आणि तयार उत्पादनांचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. विशेषतः, एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे उत्पादन शेड्यूलमध्ये विलंब झाला असल्याचे उद्योजकांनी सांगितले. यामुळे कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
उद्योजक आनंद कदम यांनी सांगितले, “आमच्या कंपनीला निर्यातीसाठी माल पाठवायचा होता, पण ट्रक उपलब्ध नसल्याने आम्ही ऑर्डर्स पूर्ण करू शकलो नाही. यामुळे आमच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे. ट्रान्सपोर्टर्स आणि प्रशासन यांनी चर्चेतून मार्ग काढावा.
यामुळे संपूर्ण सप्लाय चेन मॅनेजमेंट विस्कळीत होणार आहे. त्यामुळे उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ई-चलन व पार्किंगची समस्या यापासून प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा.
– जयदेव अक्कलकोटे, अध्यक्ष, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना…